
## बेडवर ढेकूण, डास आणि इतर किटकांचा वावर; उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना अतिरिक्त त्रास
**लोक सम्राट न्यूज नेटवर्क | सोलापूर**
सोलापूर येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आजारपणासोबतच ढेकूण, डास आणि इतर किटकांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयातील काही वॉर्डांमधील बेड, गाद्या आणि चादरींमध्ये मोठ्या प्रमाणात ढेकूण आढळत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक रुग्णांनी रात्रीच्या वेळी ढेकूण चावल्यामुळे झोप न लागणे, अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे आणि अस्वस्थता वाढल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही रुग्णांनी बेडवरून खाली उतरून बसण्याची वेळ आल्याचे सांगितले. आधीच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा परिस्थितीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

रुग्णालयातील वॉर्डांमध्ये स्वच्छतेचा अभाव, जुन्या गाद्या आणि बेडची योग्य देखभाल न होणे यामुळे ढेकूण व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची चर्चा आहे. आरोग्य विभागाने वेळोवेळी कीटकनाशक फवारणी आणि निर्जंतुकीकरण करण्याचे नियम असतानाही प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्यदायी वातावरण राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र बेडवरच ढेकूणांचा वावर असल्याचे चित्र समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित वॉर्डांमध्ये तातडीने कीटकनाशक फवारणी करावी, जुन्या गाद्या बदलाव्यात आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
### लोक सम्राटचा सवाल
राज्य सरकार आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांना ढेकूण आणि इतर किटकांच्या त्रासाला का सामोरे जावे लागत आहे? रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन तातडीने लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.