सोलापूर : शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असताना दुसरीकडे शहरातील अनेक महत्त्वाचे वाहतूक सिग्नल बंद असल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिग्नल यंत्रणा बंद असतानाही वाहनचालकांकडून नियमांचे पालन अपेक्षित ठेवले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीचा अंदाज घेत मार्गक्रमण करावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी, गोंधळ आणि अपघाताचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट, वाहन कागदपत्रे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आदींबाबत कारवाई केली जात आहे. मात्र वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सिग्नल यंत्रणाच बंद असेल, तर वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी केवळ वाहनचालकांवर टाकणे कितपत योग्य? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सिग्नल बंद असल्याने चौकांमध्ये पोलिसांना प्रत्यक्ष वाहतूक नियमन करावे लागते. मात्र प्रत्येक चौकात सातत्याने मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम राहत आहे. बंद सिग्नल मुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, काही ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता वाढत आहे.
शहरातील बंद असलेले सिग्नल तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, सिग्नल ची नियमित देखभाल करावी आणि वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणेही प्रशासनाची तितकीच जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
भगवा प्रांत न्यूज नेटवर्क | लोक विचारधारा न्यूज नेटवर्क

