
सोलापूर, प्रतिनिधी : जागतिक श्वान दिनानिमित्त लोक सम्राट न्यूज नेटवर्क यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावरील जखमी व आजारी भटक्या प्राण्यांसाठी विशेष मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात श्वानांसह गाढव, मांजर आणि इतर भटक्या प्राण्यांवर पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून मोफत उपचार करण्यात आले.

शहरातील विविध भागांतून जखमी, अपघातग्रस्त तसेच आजाराने त्रस्त असलेल्या प्राण्यांना या शिबिरात आणण्यात आले. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्राण्यांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार, जखमांवर मलमपट्टी तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. अनेक दिवसांपासून उपचारांअभावी त्रस्त असलेल्या प्राण्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला

यावेळी प्राणीमित्र, स्वयंसेवक आणि पशुप्रेमींनीही सक्रिय सहभाग घेत जखमी प्राण्यांना उपचार केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. काही प्राण्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर पुढील उपचारांची व्यवस्था देखील करण्यात आली.
लोक सम्राट न्यूज नेटवर्कच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत सामाजिक संवेदनशीलतेचे कौतुक केले. “मूक प्राण्यांप्रती दया, करुणा आणि जबाबदारीची भावना समाजात रुजविणे ही काळाची गरज आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आयोजकांनी नागरिकांना रस्त्यावरील जखमी किंवा आजारी प्राणी आढळल्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. तसेच प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
मूक प्राण्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत लोक सम्राट न्यूज नेटवर्कने श्वान दिन सामाजिक जाणीवेचा संदेश देत अनोख्या पद्धतीने साजरा केला.