
लोकसम्राट न्यूज नेटवर्क | सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अपात्र मतदार आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये संबंधित आमदारांना मागील निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या फरकापेक्षा एसआयआर प्रक्रियेत आढळलेले अपात्र मतदार अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिमेनंतर जिल्ह्यातील सुमारे ३९ लाख ४७ हजार ५७ मतदारांच्या यादीतून तब्बल ६ लाख १६ हजार ८८० मतदार अपात्र ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. या मतदारांमध्ये स्थलांतरित, मृत, दुबार नोंद असलेले अथवा इतर कारणांमुळे पात्रता नसलेले मतदार असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रक्रियेनंतर अनेक मतदारसंघांमध्ये अपात्र मतदारांची संख्या ही संबंधित आमदारांच्या विजयाच्या फरकापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी आणि त्याचा निवडणुकीच्या निकालांवर होणारा परिणाम याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसने या प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले असून, एसआयआरचे काम पूर्णपणे पारदर्शक झाले नसल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे पदाधिकारी चैतन्य नरोटे यांनी अनेक बुथस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेट न घेता अहवाल सादर केल्याचा दावा केला आहे. तसेच काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली असून ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर मतदारांना नावाबाबत दावा किंवा हरकती नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. दावा-हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत राहणार असून, त्यावरील सुनावणी आणि अंतिम निर्णयाची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मतदार यादीतील एवढ्या मोठ्या प्रमाणातील बदलांचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये विजयाचा फरक कमी होता, तेथे अपात्र मतदारांची संख्या अधिक असल्याने निकालांच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
आता सर्वांचे लक्ष ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे लागले असून, दावा-हरकतीनंतर अंतिम यादीत किती बदल होतात यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.