
१८ हजार बालकांची झाली नोंद; नवीन शुल्कामुळे उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता…

सोलापूर : सोलापूर शहरात वर्षभरात १८ हजारांहून अधिक बालकांचा जन्म, तर साडेआठ हजारांहून अधिक नागरिकांच्या मृत्यूची नोंद महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे झाली आहे. या नोंदींच्या माध्यमातून महानगरपालिकेला मागील वर्षात सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. राज्य शासनाने जन्म-मृत्यू दाखल्यांच्या शुल्कात वाढ केल्याने पालिकेच्या उत्पन्नात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने जन्म-मृत्यू दाखल्यांच्या शुल्कात वाढ केली आहे. यापूर्वी अर्जासाठी ३० रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच विलंबाने नोंदणी केल्यास लागणाऱ्या शुल्कात ही वाढ करण्यात आली आहे.
जन्म-मृत्यू घटनेनंतर संबंधित दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रक्रियेसाठी पूर्वी प्रत्येक प्रती साठी ३० रुपये दर आकारला जात होता. आता या दरात वाढ करून प्रत्येक प्रती साठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
मंजुरीनंतर अंमलबजावणी
राज्य शासनाच्या आदेशानुसार नवीन शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने तयार केला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन शुल्काची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून देण्यात आली आहे.
नवीन शुल्का मुळे जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, शुल्क वाढीमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याने त्याबाबतही नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्यता आहे.
— डॉ. वैशाली शिरशेट्टी, उपनिबंधक, जन्म-मृत्यू विभाग