
करकंब, ता. पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने युगंधर (मर्दानी खेळ), क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, करकंब यांच्या वतीने शिवकालीन शस्त्रसंग्रह, त्यांचे जतन तसेच मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे.
लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, फरीगदगा, विटा, बाणा, भाला, परा आदी पारंपरिक युद्धकलेचे प्रशिक्षण देत शिवकालीन मर्दानी खेळांची परंपरा जपण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. या पारंपरिक शस्त्रांचे महत्त्व, त्यांचा इतिहास आणि वापराची पद्धत नव्या पिढीला समजावी, यासाठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
शिवकालीन शस्त्रे ही केवळ ऐतिहासिक वस्तू नसून महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेची साक्ष देणारा अनमोल वारसा आहे. त्यामुळे या शस्त्रांचे संग्रह, संवर्धन आणि जतन करून पुढील पिढीला त्याची माहिती देणे गरजेचे आहे. मर्दानी खेळांच्या माध्यमातून युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, धैर्य आणि इतिहासाविषयी अभिमान निर्माण होण्यास मदत होत आहे.

युगंधर संस्थेच्या या उपक्रमामुळे शिवकालीन युद्धकलेचा वारसा जिवंत राहण्याबरोबरच युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे शिवकालीन शस्त्रसंग्रह व त्याचे जतन हा उपक्रम पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
“राष्ट्र रक्षासमं पुण्यं, राष्ट्र रक्षासमं व्रतम्, राष्ट्र रक्षासमं यज्ञो” या विचारातून राष्ट्ररक्षणाची भावना आणि शिवकालीन शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहे.
