
संविधान व आरक्षण बचावासाठी जुना बाजार चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार शांततामय मोर्चा; समाजातील सर्व घटकांना सहभागी होण्याचे आवाहन…
लोक सम्राट नेटवर्क | प्रतिनिधी | पुणे
पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध आंबेडकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) विरोधात शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने अनुसूचित जाती समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय अबाधित ठेवणे आणि आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११.०० वाजता जुना बाजार चौक, मंगळवार पेठ येथून मोर्चास प्रारंभ होईल. त्यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पोहोचणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे शांततामय, शिस्तबद्ध आणि संविधानिक मार्गाने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
मोर्चाद्वारे संविधानातील समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे संरक्षण करण्याचा संदेश दिला जाणार असून, “संविधान वाचवा, आरक्षण वाचवा – उपवर्गीकरणाला ठाम विरोध करा” हा प्रमुख संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या महामोर्चात विविध सामाजिक संघटना, आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते, युवक, महिला, विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समाजहितासाठी आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वांनी या मोर्चात उपस्थित राहून एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- मोर्चाची माहिती
दिनांक : शनिवार, ८ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ११:०० वाजता
मार्ग : जुना बाजार चौक, मंगळवार पेठ → डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा → जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
📸 फोटो फीचर लोक सम्राट न्यूज नेटवर्क