
अरण (ता. माढा, जि. सोलापूर) | प्रतिनिधी
श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्ट, अरण यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या ३७२ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला श्री विठ्ठलाच्या पालखीचे आगमन हे विशेष आकर्षण ठरणार असून, महाराष्ट्रातील ही परंपरा जपणाऱ्या मोजक्या ठिकाणांपैकी अरण हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

कार्यक्रमाची सुरुवात ६ ऑगस्टपासून हरिनाम सप्ताहाने झाली आहे. ८ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल पालखीचे पंढरपूरहून प्रस्थान होऊन रोपळे येथे मुक्काम असेल. ९ ऑगस्ट रोजी पालखी रोपळेहून औंधीकडे प्रस्थान करेल. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी पालखीचे अरण येथे आगमन होणार असून, गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणुकीद्वारे स्वागत करण्यात येणार आहे.
११ ऑगस्ट रोजी श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी पुष्प अर्पणाचा कार्यक्रम सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत श्रीफळ हंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
१३ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल पालखी व संत सावता महाराजांच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक, कीर्तन व भजनाचा कार्यक्रम होईल. तर १४ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊन सोहळ्याची सांगता होईल.
या धार्मिक सोहळ्यास राज्यभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.या पत्रकार परिषदेला अँड विजय शिंदे व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यांची उपस्थिती होती