
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडला.
त्यानंतर यावर भाजप कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे या नामकरणाला विरोध होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी विरोध करत पवारांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
तर संभाजी ब्रिगेडचे शाम कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन ठराव रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आता तर जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा पुतळा ही हटणार का? अशी चर्चा अन् बातम्या येऊ लागल्या आहेत.
यावर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची प्रतिक्रिया घेतली असता जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आणि वैयक्तिक इंद्रजीत पवार म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी इच्छा आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या आवारात असलेला सहकारमहर्षी यांच्या पुतळ्या बाबत विचारले असता अजिबात नाही कोणाचा पुतळा हटवून नाही पण शिवरायांचा पुतळा असावा अशी मनोमन इच्छा आहे अशी प्रतिक्रिया दिली.
जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि स्थायी समितीच्या सभेत एकमताने ठराव झाला आहे. शिवरत्न सभागृहाला अशा महान नेत्याचे नाव देणे चुकीचे आहे का असा एक प्रश्न त्यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला.