
सोलापूर | प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनानिमित्त रॉबिन हूड आर्मी, सोलापूरच्या वतीने दोन महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामध्ये ‘भारत लर्न्स एआय (Bharat Learns AI)’ आणि ‘मिशन स्वतंत्र’ या उपक्रमांचा समावेश आहे.

‘भारत लर्न्स एआय’ अंतर्गत सोलापूर शहरातील झोपडपट्टी परिसरातील तसेच ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) विषयाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीस चालना मिळणार आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात तसेच ग्रामीण भागात हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तसेच ‘मिशन स्वतंत्र’ अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू महिला व शेतकरी कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक किटमध्ये ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, १ किलो डाळ, १ किलो पीठ आणि १ लिटर तेल यांचा समावेश असणार आहे.
किराणा किटसाठी इच्छुक नागरिकांनी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
पत्रकार परिषदेला रॉबिन हूड आर्मीचे प्रा. अनिकेत चव्हाण, करण कदमबांडे आणि ओंकार आटनुरे उपस्थित होते.