
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर सेवांतील एकूण ३०,२०९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया पवित्र (Pavitra) पोर्टलद्वारे सुरू झाली आहे. या भरतीमुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेत १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वयंप्रमाणन (Self Verification) प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पदांचे विभागनिहाय वाटप
जिल्हा परिषद – १३,३५१ पदे
महानगरपालिका – १,९५६ पदे
नगरपालिका – २८० पदे
खासगी संस्था – ११,७९५ पदे
आदिवासी विकास विभाग – २,८२७ पदे
शासकीय विद्यालये – ७६ पदे
अशा प्रकारे एकूण ३०,२०९ रिक्त पदांची नोंद करण्यात आली आहे.
मुलाखतीबाबत माहिती
या भरतीपैकी १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय (Merit आधारित) भरली जाणार आहेत, तर १०,३२८ पदांसाठी मुलाखतीसह भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम (Preference) निश्चित करून लॉक करणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीत पसंतीक्रम लॉक न केल्यास पुढील निवड प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
या भरतीमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरली जाण्याची अपेक्षा असून, दीर्घकाळापासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.